Sunday, November 22, 2009

Article in Loksatta on 'Karnala Parikrama'


निसर्गचक्रासाठी सायकलची चाके!

अनिरुद्ध भातखंडे

Click here to read it on the Loksatta Website

सध्या ग्लोबल वॉर्मिग हा शब्द परवलीचा झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून कोणत्याही देशाच्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत सर्वानीच या ग्लोबल वॉर्मिगचा धसका घेतला आहे. प्रत्येक देशात यावर काही ना काही उपाययोजना सुरू आहे. इंधनांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी भारतापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या चीनमधील असंख्य नागरिक आठवडय़ातून एकदा न चुकता इंधनांच्या गाडय़ा बाजूला ठेवून सायकलला जवळ करतात. आपल्या देशात मात्र याबाबत सतर्कता दिसत नाही. केवळ मुंबईतच दररोज हजारो नवीन वाहने रस्त्यावर येतात! देशाच्या अन्य भागांचा विचार केला तर ही संख्या लाखात जाईल. यातून होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे भविष्यात भयंकर स्थिती उद्भवणार आहे. या दुरवस्थेला रोखण्यासाठी सायकलिंगलाच अधिक पसंती द्यायला हवी. अनेक तरुणांमध्ये दिवसेंदिवस याबाबत जागरुकता निर्माण होत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, वायू प्रदूषण टाळण्यासाठी सायकलला अधिक पसंती मिळावी, समाजात सायकलिंगबाबत अधिक रुची निर्माण व्हावी, या उद्देशांनी स्थापन करण्यात आलेल्या cyclists.in या ऑनलाइन क्लबतर्फे दर दिवसाआड एक उपक्रम आयोजित केला जातो. या क्लबतर्फे नुकतीच ‘कर्नाळा परिक्रमा’ आयोजित करण्यात आली होती. पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावरील कर्नाळा या शिवकालीन किल्ल्यापर्यंत ही मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेसाठीचे आरंभस्थान म्हणून नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूरची निवड करण्यात आली. भरत गोठोसकर आणि हेमंत बजाज या तरुणांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना या तरुणांनी परिक्रमेदरम्यान ऐतिहासिक आणि पुरातन स्थळांनाही भेट दिली. त्यामुळेच सीबीडीहून सुरू झालेली ही मोहीम थेट पनवेलहून न जाता तिचा मार्ग उरणमार्गे आखण्यात आला होता.पहाटे साडेसहा वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत सर्व वयोगटांचे मिळून २० जण सहभागी झाले होते. यात न्यूझीलंडचे नागरिक डेव्हीड विल्यम यांचा समावेश होता. विल्यम यांची पत्नी भारतात अध्यापनाचे काम करीत असल्याने तिला भेटण्यासाठी आले असता त्यांना या ऑनलाइन क्लबची माहिती मिळाली आणि ते उत्साहाने त्यात सहभागी झाले. २० जणांचा या चमूने प्रथम बेलापूरचा किल्ला सर केला, त्याचा इतिहास जाणून घेतला. त्यानंतर दास्तान फाटय़ामार्गे रानसई धरण, चिरनेरचा गणपती, चिरनेरच्या सत्याग्रहाची आठवण सांगणारा स्मृतीस्तंभ आदी महत्त्वाची ठिकाणे पाहून सर्वजण साई येथील युसूफ मेहेरअली सेंटर येथे पोहोचले. तेथील आयुर्वेदिक उत्पादने सर्वानी हौसेने खरेदी केली. त्यानंतर हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी सर्व सायकलवीर पोहोचले. कर्नाळा अभयारण्याला भेट देऊन त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण येथील ऐतिहासिक वाडय़ात जाऊन सर्वानी स्वातंत्र्यलढय़ाच्या स्मृती जागवल्या. दुपारी अडीच वाजता पळस्पे फाटा येथे या परिक्रमेचा समारोप झाला.


या परिक्रमेचा मार्ग कसा असेल याचा अचूक रूटमॅप गोठोसकर यांनी तयार करून तो प्रत्येकाला दिला होता. परिक्रमेदरम्यान दोन खिंडी, अनेक चढ-उतार असल्याने प्रथमोपचार आणि पिक-अप व्हॅन म्हणून ट्रकची सोय करण्यात आली होती आणि हा ट्रक प्रत्येक टप्प्यावर सर्वाची पाठराखण करीत होता. अन्य वाहनांप्रमाणे सायकलला इंधन लागत नसले तरी सायकलपटूंना चांगला खुराक द्यावा लागणार हे लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ त्रावणकोरचे नितीन तावडे आणि त्यांची पत्नी जया यांनी सर्वाच्या क्षुधाशांतीची उत्तम व्यवस्था राखली. या एकत्रित प्रयत्नांमुळे ही परिक्रमा यशस्वी झाली. यापूर्वी या क्लबने मांडवा-अलिबाग ही मोहीम यशस्वी केली आहे. त्यावेळीही त्या परिसरातील २५ महत्त्वाच्या ठिकाणांना त्यांनी भेट दिली होती. सलग दोन मोहिमा झाल्यानंतर ही मंडळी स्वस्थ बसतील असे कोणालाही वाटेल; परंतु एव्हाना त्यांनी वसई, परळ, शिवडी, कर्जत आदी मोहिमांची आखणी सुरू केली आहे! हे वाचून ही सर्व मंडळी निरुद्योगी आहेत असाही समज होईल. मात्र ३५ वर्षीय भरत गोठोसकर हे पीडीलाइट कंपनीत सरव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसतो. एमबीएची पदवी मिळविलेला हा तरुण अन्य तरुणांमध्ये सायकलप्रेम वाढावे यासाठी झटत आहे.

पर्यटन करण्यासाठी अनेकजण खूप खर्च करून लांबवर जातात, या मंडळींनी आपल्या आसपासच्या असंख्य ऐतिहासिक वास्तूंनाही भेट द्यायला हवी, हे आवर्जून सांगणाऱ्या या तरुणाचे वेगळेपण लगेचच जाणवते. आपल्या ध्येयाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी mum-biker.blogspot.com हा ब्लॉग तयार केला असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. निसर्गचक्राचा समतोल राखण्यासाठी अधिकाधिक सायकल्सची चाके फिरली पाहिजेत! कारण अजूनही वेळ गेलेली नाही.

1 comment:

  1. नमस्कार अनिरुद्ध.
    अति जबरी! सुंदर वर्णन आहे. नि मोहिमही छान झाली असणार यात शंका नाही. गोवा रस्त्यावर रानसई धरणाच्या खालील कल्हेगावापासून चिरनेरपर्यन्त एक रस्ता होतो आहे असं ऐकून आहे. त्याबद्दल काही माहिती आहे का? तो झाल्यावर त्या नवीन रस्त्याने सायकल सहल करायला मजा येईल. काही माहिती मिळाल्यस अवश्य कळवणे.

    शुभास्ते पन्थानः -
    कौन्तेय देशपांडे
    desh@live.in
    https://picasaweb.google.com/115460185052128843543/20110129DESHPANDEsKarnala

    ReplyDelete